टिटवाळ्यातील पुनर्वसन केंद्रावर गंभीर आरोप; आईचा आक्रोश, मुलानेही सांगितली आपबिती
मुलाला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी आईने केली उसनवारी
मारहाण, हातपाय बांधून ठेवल्याचा आणि वेळेवर जेवण-पाणी न दिल्याचा आरोप; केंद्राचे संचालक प्रशांत तिवारी यांच्याकडून आरोपांचे खंडन
टिटवाळा, प्रतिनिधी : दारूच्या व्यसनामुळे मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, त्याने पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात करावी, या आशेने एका आईने उसनवारी करून मुलाला टिटवाळ्यातील पुनर्वसन केंद्रात दाखल केले. मात्र, व्यसनमुक्तीच्या या प्रवासात मुलाला कथित मारहाण आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागल्याचा गंभीर आरोप आईने केला आहे. मुलाची केंद्रातून सुटका केली नसती, तर कदाचित त्याचा मृतदेहच ताब्यात घ्यावा लागला असता, अशी हृदयद्रावक व्यथा या आईने मांडली. मुलानेही आपल्यासोबत झालेल्या कथित छळाची माहिती दिल्याने टिटवाळ्यातील ‘प्रयास फाउंडेशन’ आणि ‘हॅपी टू हेल्प’ या नावांनी उल्लेख होत असलेल्या पुनर्वसन केंद्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दारूच्या व्यसनामुळे मुलाचे आयुष्य भरकटू नये, यासाठी त्याच्या आईने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मुलानेही व्यसन सोडण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याला केंद्रात नेण्यात आले. सुरुवातीला केंद्राकडून दहा हजार रुपये शुल्क सांगण्यात आले. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे आईने स्पष्ट केले. त्यानंतर पाच हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. मुलाच्या भवितव्याचा विचार करून या आईने उसनवारीने पैसे जमवले आणि त्याला केंद्रात दाखल केले.
मुलाला केंद्रात दाखल केल्यानंतर मात्र आईला त्याची प्रत्यक्ष भेट घेता आली नाही. मुलाची विचारपूस केली असता केंद्राकडून त्याचे फोटो पाठवले जात होते. या फोटोंमध्ये मुलगा हसताना दिसत असल्याने तो व्यवस्थित असेल, अशी आईची समजूत होत होती. मात्र, महिनाभरानंतर आर्थिक अडचणींमुळे मुलाला घरी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली असता, मुलाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आल्याचा दावा आईने केला. मुलाची अशी अवस्था झाली असेल, तर त्याची माहिती आधी का दिली नाही, असा सवालही तिने उपस्थित केला.
त्यानंतर प्रत्यक्ष मुलाला पाहिल्यानंतर आईला मोठा धक्का बसला. मुलाला व्यवस्थित चालताही येत नव्हते. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा दिसत होत्या. केंद्रात मारहाण करण्यात आली, हात-पाय बांधून ठेवण्यात आले आणि शारीरिक त्रास दिल्याचे मुलाने आईला सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. हात-पायांवर दोरीने बांधल्याच्या खुणा, नखांनी ओरबाडल्याच्या जखमा आणि पायावर मारहाण झाल्याच्या खुणा असल्याचेही मुलाने सांगितले. दररोज सुमारे अर्धा तास उलटे बांधून ठेवल्यासारखी शिक्षा दिली जात असल्याचा गंभीर आरोपही त्याने केला आहे.
केंद्रातील दैनंदिन व्यवस्थेबाबतही मुलाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वेळेवर जेवण आणि पाणी मिळत नव्हते, झोपण्यासाठी योग्य व्यवस्था नव्हती, तसेच रेशनचे तांदूळ साफ करण्यास सांगितले जात होते, असे त्याने सांगितले. समुपदेशनाच्या नावाखाली केवळ अर्धा तास बैठक आणि ध्यानधारणा होत असे. त्यानंतर दिवसभर एकाच जागी बसून राहावे लागत असल्याचेही त्याने सांगितले. औषधे किंवा इंजेक्शन दिले जात होते का, असे विचारले असता त्याने नकार दिला. या कथित छळानंतर पायातील नसांवर परिणाम झाल्यासारखे वाटत असून चालताना पायातील चप्पलही निघून जात असल्याची व्यथाही त्याने मांडली.
या प्रकारानंतर आईने मुलाला रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोप आईने केला. मात्र, या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी जनताहीत फाउंडेशनचे सचिव नियाज शेख यांनी पुढाकार घेतला. स्वतः उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असतानाही रितेश कांबळे यांनी या प्रकरणाकडे लक्ष वेधले. स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी या प्रकरणाच्या पाठपुराव्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यानंतर पुढारीचे पत्रकार अजय शेलार, मीडिया भारतचे पत्रकार प्रफुल्ल केदारे आणि आर्टिकल 19 चे पत्रकार संदीप शेंडगे यांनीही या प्रकरणाला प्रसिद्धी देत पाठपुरावा केला. मुलाची पुन्हा डॉक्टरांकडून तपासणी करण्यात यावी आणि तक्रारीची दखल घेतली जावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे आईने सांगितले. आता अन्य कोणत्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये आणि या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी तिने केली आहे.
दरम्यान, या प्रकरणी केंद्राचे संचालक प्रशांत तिवारी यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी केंद्रावरील आरोपांचे खंडन केले. केंद्राच्या नावाबाबत त्यांनी ‘प्रयास फाउंडेशन’ असा उल्लेख केला. त्यामुळे संबंधित केंद्राचे अधिकृत नाव, नोंदणी, परवाना आणि प्रत्यक्ष कामकाज याबाबत संबंधित यंत्रणांनी स्पष्टता आणणे आवश्यक ठरणार आहे.
व्यसनमुक्ती केंद्रांच्या नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर
व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा सामान्य आयुष्याच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम व्यसनमुक्ती केंद्रांकडून अपेक्षित असते. अशा केंद्रांमध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि सन्मानाची काळजी घेणे ही संबंधित संस्थांची जबाबदारी आहे. मात्र, व्यसनमुक्तीच्या नावाखालीच मारहाण, बांधून ठेवणे आणि मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यासारखे प्रकार घडत असल्याचे आरोप होत असतील, तर त्याची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. संबंधित केंद्राची अधिकृत नोंदणी, परवाना, रुग्णांच्या देखभालीची व्यवस्था आणि उपचारपद्धती यांची सक्षम शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी होण्याची गरज आहे.
एका आईने मुलाच्या उपचारासाठी उसनवारी करून पैसे भरले. मुलगा सुधारेल, पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहील, अशी तिची अपेक्षा होती. मात्र, त्याच मुलाला केंद्रातून बाहेर काढताना त्याची झालेली अवस्था पाहून या आईच्या काळजाचा ठाव सुटला. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पत्रकारांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला असला, तरी आता खरी जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणले जाणार का


Leave a Reply